छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहराच्या २,७४० कोटी रुपयांच्या पाणी योजनेअंतर्गत टाकण्यात आलेल्या २,५०० मिलीमीटर व्यासाच्या पाइपलाइनची चाचणी घेतली जात आहे. या चाचणीला शुक्रवारी (दि. २८) ब्रेक लागला. कारकीनजवळ मुख्य पाइपलाइनची वेल्डिंग निखळल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जीव्हीपीआर कंपनीच्या अधिकार्यांना धक्का बसला. निखळलेली वेल्डिंग दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, रविवारपर्यंत (दि.२९) हे काम पूर्ण होईल, असे सूत्रांनी सांगितले.
शहरासाठी २,७४० कोटी रुपये खर्चुन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणी योजनेचे काम केले जात आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात २०० एमएलडी पाणी शहरात आणण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार १९ मार्चला पाडव्याच्या मुहूर्तावर सायफन पद्धतीने नाथसागरातील पाणी उपसा विहिरीत (जॅकवेल) पाणी घेण्यात आले. हा टप्पा यशस्वी झाल्यानंतर सोमवारी (दि.२३) जॅकवेलवरील ३७०० अश्वशक्तीच्या दोन पंपांची चाचणी घेण्यात आली. तीही यशस्वी ठरली. पहिल्या दिवशी मुख्य २,५०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीत ९०० मीटरपर्यंत पाणी घेण्यात आले. हे पाणी स्मशानभूमीजवळ स्क्रोल व्हॉल्व्हमधून सोडून देण्यात आले. त्यानंतर दुसर्या दिवशी साडेतीन किमी अंतरापर्यंत संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यासमोर असलेल्या व्हॉल्व्हपर्यंत पाणी आणण्यात आले. तिसर्या दिवशी ढोरकीनपर्यंत दहा किलोमीटरपर्यंत पाणी घेण्यात आले.
यावेळी काही ठिकाणी गळत्या आढळून आल्या. चाचणी घेत असताना या गळत्या बंद करण्यात आल्या. त्यानंतर चौथ्या दिवशी मुख्य पाइपलाइनमधून कारकीनपर्यंत पाणी आले. परंतु त्याठिकाणी पाइपलाइनची वेल्डिंग निखळल्याचे लक्षात आले. पाइपलाइनमध्ये पाणी असल्याने काम करता येत नव्हते. पाइपलाइन रिकामी करण्यात आल्यानंतर वेल्डिंग करण्याच्या कामाला सुरुवात झाली. पाणीपुरवठा सुरू होण्यापूर्वीच मुख्य पाइपलाइनची वेल्डिंग निखळल्याचे समोर आले. त्यानंतर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले.










